
अटक टाळण्यासाठी आरोपीच्या भावाकडून दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर हणमंतराव तरडे यांच्यासह अन्य दोघांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा नोंदविला असून यापैकी तरडे यास अटक करण्यात आली आहे.
लोहा पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या भावाविरुध्द एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आपल्या भावाला अटक करु नये अशी मागणी तक्रारदाराने केली होती. यासाठी लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर हणमंतराव तरडे यांनी दहा हजार रुपयांची रक्कम मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री या पथकाने सापळा रचला आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीधर हणमंतराव तरडे हा एका खासगी इसमाव्दारे सदरच्या दहा हजार रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यास अटक करण्यात आली. यातील अन्य दोन आरोपी उत्तम गायकवाड व संजय ससाने यांच्याविरुध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्या दोघांना अद्याप अटक करण्यात आली नाही. पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीत ही रक्कम घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे श्रीधर तरडे यांना अटक करुन त्यांच्याविरुध्द लोहा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

































































