
नांदेड शहरातील जुना मोंढा भागात एका व्यापाऱ्याची तब्बल ३५ लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी दि.८ डिसेंबर रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलीस कसून तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
जुना मोंढ्यातील तेलाचे व्यापारी विनायक पारसेवार हे सोमवारी रात्री आपले दुकान बंद करून जात होते. त्यांचे चार चाकी वाहन अचानक पंक्चर झाले. चोरट्यांनीच ही कार पंक्चर केली असावी असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहन पंक्चर झाल्याने पारसेवार हे गाडीतून उतरले. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या कारमधील रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. दोघे चोरटे दुचाकीवरून पळून गेल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनंतर पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत. सीसीटीव्हीच्या आधारेही चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, वजीराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम आदी पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्याचवेळी व्यापाऱ्याकडील रकमेबाबतही माहिती घेतली जात आहे. व्यापाऱ्याने सांगितल्याप्रमाणे खरोखरच इतकी रक्कम होती का याबाबतही खात्री केली जात आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे तसेच भीतीचे वातावरण पसरले आहे.




























































