नांदेडला बाप्पा पावला, विष्णूपुरी धरण भरल्याने पाणी संकट टळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडमध्ये गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे  विष्णूपुरी प्रकल्पात दुपारी तीन वाजता 94 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासोबत नांदेडकरांचे जलसंकट आता बर्‍यापैकी सुटले आहे. नांदेडकरांना आता आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून, मंगळवारी याबाबत निर्णय होणार आहे. 

नांदेड जिल्ह्यात 30 ऑक्टोबरपर्यंत 50 टक्केही पाऊस झाला नव्हता. मात्र गेल्या तीन दिवसात हे चित्र बदलले आणि या तीन दिवसात झालेल्या पावसामुळे नांदेडकरांनी मोकळा श्वास घेतला. यावर्षी विष्णूपुरी प्रकल्प भरणार की नाही, नांदेडकरांना पाणी मिळणार की नाही अशी अवस्था होती. सप्टेंबर अखेरपर्यंत नांदेडकरांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या 25 ते 30 वर्षातील हि पहिलीच वेळ. त्यामुळे नांदेडकर त्रस्त झाले होते.

मनपाने व काही स्वयंसेवी संस्था आणि नगरसेवकांनी वेगवेगळ्या भागात टँकरने पाणीपुरवठा करुन मे, जून, जुलै या तीन महिन्यात दिलासा दिला होता. पावसाळा सुरु होऊनही ऑगस्ट अखेरपर्यंत विष्णूपुरी प्रकल्प 50 टक्केही भरला नव्हता. जायकवाडी प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी विष्णूपुरी प्रकल्पात केवळ दहा टक्केच पोहचले. त्यामुळे ही चिंता आणखीनच वाढली. मात्र गेल्या तीन दिवसात वरील भागात तसेच धरण क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे आज दुपारी तीन वाजता विष्णूपुरी प्रकल्प 94 टक्के भरला. या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे होणारा विसर्ग आणि नदीपात्रातील परिस्थिती याचा अंदाज व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.