
भाजपचे नेते खोटे बोलण्यात पटाईत आहे. भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी व अमित शहा धादांत खोटे बोलतात व तोंडावर आपटतात. छत्तीसगडमधील एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात मोदी सरकारच्या आधी एकही एम्स नव्हते अशी थाप मारली. मात्र, अमित शहा यांना माहित नसावे की देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशातील पहिले एम्स दिल्लीत 1953 साली सुरु केले व आजही ते पहिल्या क्रमांकावर आहे, असे जबरदस्त टोला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावत अमित शहांच्या फेकाफेकीची हवा काढली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचा खोटेपणा उघड करताना अतुल लोंढे यांनी देशातील एम्सची यादीच वाचून दाखवली. दिल्लीतील एम्सनंतर जोधपूर, भुवनेश्वर, ऋषीकेश, पटणा, भोपाळ, रायपूर आणि रायबरेली येथे एम्स सुरू करण्यात आली आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता 2014 साली येण्याआधीच या एम्सची उभारणी झालेली आहे. एम्सबरोबरच, आयआयएम, डीआरडीओ, आयआयटी या संस्थांचा पायाही पंडित जवाहरलाल नेहरु यांनीच घातला आणि त्यावर देश उभा राहिला.
निवडणुकीच्या प्रचारात बिनधास्त खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा मोदी-शहा प्रयत्न करत असतात. मात्र, जनता डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. बिहारमध्ये एम्स सुरु केल्याची बतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. तसेच केरळातही एम्स सुरु केल्याचे सांगितले पण दोन्ही ठिकाणच्या लोकांनी शहानिशा करुन मोदींच्या दाव्यातील हवा काढली. खोटे बोल पण रेटून बोल तसेच जुमलेबाजी करणे याशिवाय मोदी-शहांना काहीच येत नाही, असा टोलाही लोंढे यांनी लगावला.

























































