
सामना ऑनलाईन, फैजाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी अयोध्येत जाहीर सभा होणार आहे. सपा-बसपची आघाडी आणि प्रियंका गांधी यांच्या प्रचारामुळे निर्माण झालेले वातावरण फिरवण्यासाठी मोदींची सभा भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. फैजाबाद मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी येणार असले तरी या मतदारसंघासोबतच आसपासच्या मतदारसंघांसाठीतील भाजपच्या उमेदवारांचाही ते या सभेद्वारे प्रचार करणार आहेत.
अयोध्या नगरी हा फैजाबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. मोदींची सभा अयोध्येपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोसाईगंज भागात होणार आहे. या सभेमुळे पाचव्या टप्प्यात मतदान होत असलेल्या आंबेडकर नगर, सुल्तानपूर, आजमगड, बस्ती, जौनपूर प्रतापगड या मतदारसंघांसोबतच सहाव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या फैजाबाद, बाराबंकी, बहराईच, केसरगंज आणि गोंडा मतदारसंघांतील उमेदवारांनाही फायदा होईल अशी भाजपला आशा वाटते आहे. या सगळ्या मतदारसंघात 2014 साली भाजपने विजय मिळवला आहे.
यंदाच्या निवडणुकीत सपा-बसप आघाडीकडे भाजपला गेल्या निवडणुकीत मिळालेली दलित तसेच अल्पसंख्यांकांची मते वळतील तर प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे सवर्णांची मते काँग्रेसकडे वळतील असा अंदाज बांधला जातोय. त्यामुळे मोदींची आजची सभा भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. भाजपने केंद्रात आणि उत्तर प्रदेशात आल्यापासून अयोध्येत वेळोवेळी भव्य कार्यक्रम आयोजित केले आहेत. भाजपने फैजाबादचे नामककरण अयोध्या केले असून अयोध्येत रामाची भव्य प्रतिमा उभी करणार असल्याची घोषणाही केली आहे.
राम मंदिराच्या मुद्दावरून सुरू केलेल्या आंदोलनाचा आधार घेत लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपचे नाव आणि सर्वदूर पसरवले. याच मुद्दावरून भाजपने राजकारणात उभारीही घेतली. अयोध्या आणि राम मंदिराच्या मुद्दामुळेच भाजपच्या खासदारांची संख्या 1989 साली 2 वरून 85 पर्यंत पोहोचली. 1991 साली भाजपचे 221 आमदार विजयी झाले होते. त्याआधारे भाजपने उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन केली आणि कल्याण सिंह तेव्हा मुख्यमंत्री झाले होते. 2014 च्या निवडणुकीतही भाजपला जबरदस्त यश मिळालं होतं. त्याची पुनरावृत्ती करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळेच आजची ही सभा अत्यंत महत्वाची मानली जात आहे.




























































