लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबईत येत आहेत. मोदी यांच्या रोड शोसाठी अनेक रस्ते बंद ठेवले आहेत. त्यामुळे त्या मार्गाने प्रवास करणारे अनेक प्रवाशी मेट्रो व रेल्वेवर अवलंबून होते. मात्र अचानक बुधवारी दुपारी अचानक मुंबई मेट्रोने मेट्रो सेवा सायंकाळी सहा वाजल्यापासून बंद ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही मेट्रो सेवा बंद राहणार आहे. मेट्रोने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.
राज्यातील शेवटच्या आणि पाचव्या टप्यासाठी मुंबईत पुढील आठवडय़ात मतदान होणार आहे. पंतप्रधान मोदी हे रोड शोसाठी बुधवारी मुंबईत येत आहेत. ईशान्य मुंबईत हा रोड असल्याने तेथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजणार आहेत. रोड शोमुळे लाल बहादूर शास्त्री मार्गावरील गांधी नगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन (उत्तर आणि दक्षिण) वाहिनी ही बंद असणार आहे. माहुल घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर बी. जंक्शन दोन्ही वाहिनी या सर्व प्रकारच्या वाहनांना दुपारी दोन ते रात्री 10 पर्यंत बंद असणार आहे. या रोडमुळे अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर आणि दक्षिण वह्निवरील वाहतूक, हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन येणारी वाहतूक, गोळीबार नगर व घाटकोपर मेट्रो स्थानक येथून सूर्योदय जंक्शन येणारी वाहतूक बंद असेल.
तर रोड शो मुळे रस्ते बंद केल्याने घाटकोपर पूर्व कडील 90 फूट रोड ने पंतनगर पोलीस ठाण्या समोरून एजीएलआर रोडने श्रेयस जंक्शन येथून पश्चिमेला जाता येईल. लाल बहादूर शास्त्राr मार्गाचा वापर करणारी वाहने ही पूर्व द्रुतगती मार्गाचा वापर करतील. अंधेरी घाटकोपर लिंक रोडचा उपयोग करून अंधेरी- कुर्ला मार्गाचा वापर करून पुढे सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोड, एम जी रोड ने जाणारी वाहने बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करून पुढे 90 फूट रोड मार्गे पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करून इच्छुक स्थळी जातील असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.