हिंदुस्थानातील 1300 बेटांचा शोध मीच लावला, त्यातील काही बेटे सिंगापूरपेक्षाही मोठी आहेत अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या जुनागढमधील जाहीर सभेमध्ये मोदींनी हे विधान केले होते.
हिंदुस्थान आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या कच्चथिवू बेटाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये चर्चेत आला होता. त्या बेटावरून मोदींनी काँग्रेसवर आरोप केला होता. काँग्रेस सत्तेवर असती तर अशा बेटांचा काँग्रेसने सौदा केला असता अशी टीका त्यांनी केली होती. आता 1300 बेटे शोधून काढल्याच्या मोदींच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसच्या राजवटीमध्ये देशातील बेटांच्या संख्येबाबत निश्चित माहितीच सरकारकडे नव्हती. आपण पंतप्रधान झाल्यानंतर उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करून देशाच्या सागरी किनाऱयांच्या आसपास 1300 बेटे असल्याचा शोध लावला. त्यापैकी काही निवडक बेटे पर्यटनासाठी विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आपल्या देशातील लोक बाहेरच्या देशातील बेटांवर पर्यटनासाठी जाणार नाहीत आणि परदेशातील लोपंच इथे येतील, असे मोदी जुनागढमधील सभेत म्हणाले होते.