भावी मंत्रिमंडळाबाबत आलेल्या बातम्या खोट्या : नरेंद्र मोदी यांनी केले स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवल्यानंतर शनिवारी संसदेमध्ये एनडीएच्या संसदीय पक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड केली आहे. आणि यानंतर रात्री आठ वाजता एनडीएचे नेते राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.

तत्पूर्वी या बैठकीत नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करताना म्हणाले की, भावी मंत्रिमंडळाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. संपूर्ण जगाचं लक्ष हिंदुस्थानच्या निवडणुकांकडे लागलं होतं. एखादी निवडणूक किती मोठी व्यापक असू शकते, हे जगासाठी एक आश्चर्य आहे. देशातील जनतेनं नव्या युगाची सुरुवात केली आहे.एनडीए म्हणजे उर्जा आहे. नवी उर्जा घेऊन आता कामाला लागूया, असेही ते म्हणाले. पाच वर्षात जनता आणि सरकारमध्ये विश्वासाचे नातं तयार झालं आहे.देशातील लोकशाही अधिक प्रगल्भ होत आहे. या देशातील मातृशक्तीने देशाचं भवितव्य ठरवलं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात महिला संसदेत निवडून आल्या आहोत. अटलजी, आडवाणींपासून सुरू झालेली यात्रा आजही सुरू आहे. अटलजींचे संस्कार आज आम्हाला दिशा दाखवत आहेत, त्या मार्गावर आम्ही चालणार आहोत. कोणताही भेदभाव न करता काम करणार असल्याचं ते म्हणाले. अहंकाराला दूर ठेवा, आपल्यामधील कार्यकर्ता नेहमी जिवंत ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. सर्व खासदारांनी वादग्रस्त वक्तव्ये आणि वाचाळपणा करून नये, अंहकाराला दूर ठेवावे. दिखावा आणि व्हीआयपी कल्चर यापासून दूर राहिलात, तर आपण बऱ्याच गोष्टी वाचवू शकतो. ‘सबका साथ, सबका विकास’ याच धोरणाने पुढील वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक म्हणजे संबंधित अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा दल आणि निवडणूक आयोगासाठी एक कठोर कालखंड असतो. या कामासाठी योगदान देणाऱ्या हरएक लहान मोठ्या घटकाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. निवडणूक हा एक उत्सव आहे. मतदानही अनेक रंगांनी रंगलेलं होतं. पण विजयोत्सव हा अधिक रंगतदार आहे. देशाच्या या विजयोत्सवात जे जे सामील झाले त्या सर्वांचे अभिनंदन, असं मोदी यावेळी म्हणाले.

प्रचंड जनादेशाचे आभार मानत मोदी पुढे म्हणाले की, प्रचंड प्रमाणातला जनादेश हा तितक्याच मोठ्या जबाबदारीला जन्म देतो. यासाठी नवी उर्जा आणि नवी आशा लागते, आम्हाला तेच घेऊन पुढे जायचं आहे. लोकशाहीला अजून समजून घेणं आवश्यक आहे. देशातील नागरिकांचा नीरक्षीरविवेक समजून घेणं आवश्यक आहे. भारताची लोकशाही दिवसेंदिवस प्रगल्भ होत जात आहे. अनेक पारंपरिक गोष्टी जसं की सत्तेचा प्रभाव मतदार प्रभावित करू शकत नाही. मोठ्यातील मोठ्या सत्तेच्या सामर्थ्यासमोरही मतदार सेवाभावाला मत देतात. जनतेने आम्हाला सेवाभावासाठीच स्वीकारलं आहे. सत्तेच्या वातावरणातही सत्तेच्या मोहापासून अलिप्त राहावं लागतं. हा सेवाभाव आमच्यासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक आहे, असं मनोगत मोदी यांनी व्यक्त केलं आहे.