Sahitya Sammelan – कविवर्य कुसुमाग्रजनगरी देखण्या रूपात सजतेय, साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 16 वर्षांनी नाशिक शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. येत्या शुक्रवारपासून हा तीनदिवसीय मायमराठीचा उत्सव सुरू होत असून, आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी कविवर्य कुसुमाग्रजनगरीच्या रूपात सजतेय. येथे मुख्य मंडपाची उभारणी पूर्ण झाली असून, भिंतींची शोभा गोदाकाठचे सौंदर्य दाखविणारी चित्रे आणि वारली कलेने वाढली आहे.

आडगावच्या भुजबळ नॉलेज सिटीत 3 ते 5 डिसेंबर या कालावधीत 94वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाला अवघे तीनच दिवस बाकी असून, तयारी आता पूर्णत्वाकडे पोहचली आहे. सात हजार आसनक्षमतेचा मुख्य मंडप, अडीचशे क्षमतेचा उपमंडप, दीडशे व्यक्ती बसतील असे तीन सभागृहे, याव्यतिरिक्त बालकवी मंच, कवी कट्टा, गझल कट्टा, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन मंच हेही स्वतंत्र असतील. नाशिकचे महत्त्व सांगणारी नाशिक पॅव्हेलियन, महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स येथे असणार आहेत. ही सर्वच तयारी वेगात सुरू आहे.

मुख्य मंडपात दोन एलईडी वॉल, बारा एलईडी स्क्रीन

मुख्य मंडप 60 मीटर बाय 250 मीटर आकाराचा असून, जर्मन स्ट्रक्चरने साकारला आहे. त्यात साधारण सात हजार रसिक बसतील अशी क्षमता आहे. त्याच्या दोन्ही बाजूस मोकळी जागा आहे. व्यासपीठ 80 फूट बाय 45 फूट आकाराचे असून, त्यात तीन टप्पे केले आहेत. आत येण्यासाठी पाच प्रवेशद्वारे असणार आहेत. व्यासपीठावर दोन्ही बाजूस एलईडी वॉल आणि एकूण बारा एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली जात आहे.

भिंतींवर गोदाघाट, वारली चित्रे

भुजबळ नॉलेज सिटीच्या भिंतींवर गोदाघाटावरील मंदिरांची चित्रे युवा चित्रकारांनी चितारली आहेत. त्याचबरोबर मुख्य मंडपाजवळील भिंतींची शोभा वारली चित्रशैलीने वाढली आहे. बालकवी कट्टा देखील देखण्या रूपात तयार होत आहे.