गोदावरी प्रदुषणप्रकरणी सहा महिन्यात 88 गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या सहा महिन्यात गोदावरी नदी प्रदुषणप्रकरणी 88 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीच्या ऑनलाईन आढावा बैठकीत पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली.

विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता दुश्यंत उइके, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, निशीकांत पगारे, राजेश पंडीत ऑनलाईन उपस्थित होते.

गोदावरी नदी प्रदुषण करणाऱ्यांवर मुंबई कायद्यानुसार गेल्या सहा महिन्यात 88, तर 2016 पासून आतापर्यंत एकूण 3 हजार 856 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी 82 हजार 500 रूपयांचा दंड वसुल करून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त तांबे यांनी दिली.

यावेळी नदी प्रदुषण रोखण्यासाठी विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. नाशिकरोड येथील पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदुषणविरहीत करणे, वालदेवी नदीमधील प्रदुषणावर जिल्हा परिषद व महापालिकेने केलेली कार्यवाही तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत सिव्हेज ट्रिटमेंट प्लँट तयार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्याचे महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.

पिंपळगाव खांब व तपोवन भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पिंपळगाव खांब येथील जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संपादीत करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली.