फरार कैद्याला संभाजीनगरातून अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

तीन वर्षांपूर्वी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून संचित रजेवर सुटल्यानंतर फरार झालेल्या कैद्याला संभाजीनगर येथून नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील अमोल एकनाथ गंगावणे (28) याने 2011 मध्ये एका परप्रांतीय व्यक्तीचा खून केला होता. याप्रकरणी 2013 मध्ये त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती. 21 मार्च 2015ला तो मध्यवर्ती कारागृहातून संचित रजेवर सुटला होता. मात्र त्यानंतर तो परत हजर न होता फरार झाला होता. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. तो संभाजीनगर शहरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. तेथील एमआयडीसी परिसरातील विविध वस्त्या, भाडेतत्त्वावरील रहिवासी वसाहतीमध्ये गंगावणेचा शोध घेण्यात आला. गंगावणे वाळुंज एमआयडीसीलगत वळदगाव येथे भाड्याने खोली घेवून राहत असून, कंपनीत काम करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार 28 नोव्हेंबरला त्याला कंपनीतून ताब्यात घेण्यात आले.

गंगावणे हा फरार झाल्यापासून मुंबई, नाशिक, संभाजीनगर जिह्यातील विविध ठिकाणी लपून राहत होता. नाशिक जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे, अप्पर पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक निरीक्षक आशीष अडसूळ, हवालदार प्रकाश चव्हाणके, रवींद्र वानखेडे, दिलीप घुले, पोलीस नाईक प्रितम लोखंडे, कॉन्स्टेबल गोकुळ सांगळे, नीलेश कातकाडे, किरण काकड, संदीप लगड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.