
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन झीरो’ या अभियानाअंतर्गत भारतीय जैन संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून स्मार्ट हेल्मेटद्वारे थर्मल स्क्रिनिंग सुरू करण्यात आले आहे. दुपारपर्यंत तीन हजार शेतकऱ्य़ांची स्मार्ट हेल्मेटद्वारे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र कोरोनाला आळा घालण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने नाशिक बाजार समितीनंतर आता लासलगाव बाजार समितीतर्फे स्मार्ट हेल्मेटद्वारे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत तीन हजार शेतकरी, व्यापारी व हमालांचे स्मार्ट हेल्मेटद्वारे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले असून 15 जणांचे शरीराचे तापमान वाढल्याचे आढळून आल्याने त्यांची बाजार समितीच्या वतीने रॅपिड अॅँटिजेन चाचणी करण्यात आली. यात सर्वांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने बाजार समितीच्या वतीने सुटकेचा निःश्वास सोडण्यात आला.































































