नाशिक – गांधीनगरला पुन्हा बिबट्या जेरबंद

566
leopard

नाशिकरोडजवळील गांधीनगरच्या कॉम्बट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कुल आवारातील पिंजऱ्यात गुरुवारी पहाटे बिबट्याची मादी जेरबंद झाली. या भागात अवघ्या पाच दिवसात बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची ही दुसरी घटना आहे. या परिसरात जास्त बिबट्यांचा संचार सुरू असल्याने पिंजरा कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. कॅट्स आवारातील हेलिकॉप्टरची धावपट्टी व कॅट्स पोस्ट क्रमांक-1 मधील गवताळ भागात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी, 29 फेब्रुवारीला पहाटे एक नर बिबट्या अडकला होता. तेथील नागरिक व अधिकाऱ्यांनी पिंजरा कायम ठेवण्याची मागणी वनविभागाकडे केली होती. त्यानुसार पुन्हा तेथे पिंजरा लावण्यात आला होता. येथे गुरुवारी पहाटे एक सात वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकली. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी एम. एस. गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरी यांनी घटनास्थळी जावून बिबट्याच्या मादीला पिंजऱ्यासह ताब्यात घेतले. पशुवैद्यकीय अधिकारी वैशाली थोरात यांनी या मादी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. कॅट्स आवारात एकाहून अधिक बिबट्यांच्या पावलांचे ठसे आढळले आहेत, त्यामुळे पिंजरा कायम ठेवण्याची मागणी तेथील अधिकाऱ्यांनी केली, अशी माहिती वनविभागाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या