
सीआरपीएफचे सहाय्यक कमांडंट नितीन भालेराव हे तब्बल सात महिन्यांनंतर परवा सुट्टी घेऊन नाशिकला घरी येणार म्हणून कुटुंबीय आनंदात होते. प्रत्यक्ष भेटीची सर्वांना ओढ होती. मात्र अचानक रविवारी ते शहीद झाल्याची बातमी धडकली आणि भालेराव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
निफाड तालुक्यातील देवपूर हे नितीन पुरुषोत्तम भालेराव यांचे मूळ गाव. त्यांचे वडील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीला होते. मात्र, नितीन लहान असतानाच वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांचे शिक्षण सिन्नरला झाले. आईने बालवाडी शिक्षिकेची नोकरी करीत मुलांना चांगले शिक्षण दिले. नितीन यांचे मोठे भाऊ अमोल आयएसपीत, तर छोटे भाऊ सुयोग हे लेक्चरर आहेत, अशी माहिती मामा अनिल रत्नपारखी यांनी दिली.
संघर्षातून पुढे येत नितीन यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. 2008 मध्ये ते सीआरपीएफमध्ये उपनिरीक्षकपदी रूजू झाले. गुजरात, दिल्लीत कर्तव्य बजावल्यानंतर माऊंट आबू येथील, तसेच कोब्रा बटालियनच्या प्रशिक्षणात ते उत्पृष्ट प्रशिक्षणार्थी ठरले. नुकतेच जूनमध्ये भंडारा येथे दाखल होण्यापूर्वी मे महिन्यात ते सुट्टीवर घरी आले होते. त्यानंतर केवळ फोनवर बोलणे होत होते. दिवाळीत आई आणि कुटुंबीयांनी त्यांचे ऑनलाईन औक्षण केले. परवा ते प्रत्यक्ष भेटणार म्हणून सर्वचजण आनंदात होते. 21 डिसेंबरच्या वाढदिवसाचीही प्रतिक्षा होती. मात्र, ही अनपेक्षित घटना घडली, असे सांगताना त्यांचे भाऊ अमोल यांना अश्रू अनावर झाले. नितीन यांच्या पश्चात आई भारती, दोन भाऊ, पत्नी रश्मी आणि पाच वर्षांची मुलगी अन्वी असा परिवार आहे.
































































