नाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी ‘डोनेट अ डिव्हाईस’ चळवळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांकडे कुठलेच साधन उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेने अभिनव‘डोनेट अ डिव्हाईस’चळवळ हाती घेतली आहे. नागरिकांनी घरी पडून असलेले जुने अँड्रॉईड मोबाईल या विद्यार्थ्यांना द्यावेत, असे आवाहन करीत बुधवारी चळवळीचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर तंत्रसेतू नाशिक हेल्पलाईन व विद्यावाहिनी रेडिओ या उपक्रमांचा श्रीगणेशा करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी सकाळी या उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेबक्षीरसागर, आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखा दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर उपस्थित होते. शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनीही कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेतला. विविध स्वयंसेवी संस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन लीना बनसोड यांनी यावेळी केले.

तंत्रसेतू, विद्यावाहिनी रेडिओ उपयुक्त

तंत्रसेतू नाशिक शिक्षण हेल्पलाईन टेलिग्रॅम चॅनलचा वापर करुन शैक्षणिक संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आली आहे. टेलिग्रॅमऍपद्वारे तंत्रसेतूत सहभागी होता येईल. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत,तसेच जेथे रेंजची समस्या आहे,त्यांच्यासाठी नाशिक आकाशवाणीद्वारेदररोज दोन तास सकाळी व संध्याकाळी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित केले जातील.