
सामना प्रतिनिधी । नाशिक
घरफोड्या करणाऱ्या तीन सराईत महिलांची टोळी नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जेरबंद केली आहे. निफाडच्या चांदोरी येथील फॅब्रिकेशनच्या दुकानाचे शटर तोडून केलेल्या घरफोडीची त्यांनी कबुली दिली आहे.
निफाडजवळील चांदोरी येथील दीपक खर्डे यांच्या फॅब्रिकेशनच्या दुकानाचे शटर तोडून 22 जानेवारीला चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाकडे या गुल्ह्याचा तपास होता. घटनास्थळाची पाहणी व सीसीटीव्ही फुटेजवरून तीन संशयित महिलांचा त्यांनी शोध सुरू केला.
नाशिकच्या गंजमाळ भागातील भिमवाडी येथील महिला मंगल सोनवणे (40), शारदा गरकडे (28), मंदा शारबिद्रे (40) या महिलांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली. गंजमाळ येथील मोईन अली हुसेन पठाण याच्या मदतीने चांदोरी येथील फॅब्रिकेशनच्या दुकानात चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. चोरीचा मुद्देमालही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. या टोळीने नाशिक शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. यातील महिला ल्ह्या दिवसा भंगार गोळा करतात, त्याचवेळी बंद घरे व दुकानांची टेहळणी करतात. यानंतर पाळत ठेवून घरफोड्या करतात, असे समोर आले आहे. ही टोळी पकडण्याची कामगिरी निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक निरीक्षक आशीष आडसूळ, रवींद्र शिलावट, सुधाकर खरोले, नंदू काळे, राजू सांगळे, गोकुळ सांगळे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, योगिनी नाईक यांच्या पथकाने पार पाडली.




























































