आता मांजराच्या गळय़ात एक नाही, अनेक घंटा बांधण्याची वेळ आलीय; जावेद अख्तर यांनी साहित्यिकांचे कान टोचले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रज्ञा सदावर्ते / भाग्यश्री कुलकर्णी

कलावंत, साहित्यिक जोपर्यंत सुंदर कला घडवतो तोपर्यंतच राजे, जमीनदारांसारख्या मोठय़ा माणसांना त्याच्याविषयी प्रेम असते. मात्र, सामान्यांचे अश्रू आणि दुःखाविषयी ते लिहू लागले की, खतरनाक आणि अॅण्टीनॅशनल ठरवले जातात. त्यामुळे साहित्यिकांनीच आता आपली लेखणी देशासाठी, समाजाच्या समतेसाठी चालवली पाहिजे. आज याचीच जास्त गरज आहे. ही एकतेची ताकद दाखवली पाहिजे. कारण आता मांजराच्या गळ्यात एक नाही, तर अनेक घंटा बांधायची वेळ आली आहे, अशा कडक शब्दांत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देशातील सद्य राजकीय स्थितीवर भाष्य केले.

नाशिकच्या आडगाव येथील कविवर्य कुसुमाग्रजनगरीत लोकहितवादी मंडळ आयोजित 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शुक्रवारी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. प्रारंभी त्यांनी मराठी भाषेची श्रीमंती सांगितली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचा उल्लेख केला. मराठीतील कविता ऐकल्यावर मला साहित्याचा मोठा खजिना मिळाला असेच जाणवले. मराठीतील संतमंडळींनी जनतेशी सहज संवाद साधावा, तसे विचार मांडले. संत मुक्ताबाई आठशे वर्षांपूर्वी काव्यरचना करीत होत्या, ज्या काळात परदेशात तर काही कवयित्रींना पुरुषांची नावे धारण करून लिहावे लागे. हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असे त्यांनी सांगितले. आता स्वातंत्र्य कमी होतेय. कवी, लेखक, सामान्यांना किंमत नाही. लेखण्या थांबल्यात, जीभ अडखळते अशा परिस्थितीत एकतेची ताकद गरजेची आहे. सध्या प्रत्येकजण घाबरलाय, तुमची लेखणी काय करतेय? हे ठीक नाही. आता मांजराच्या गळ्यात एक नाही, अनेक घंटा बांधणे गरजेचे आहे, असे सांगून शेवटी त्यांनी स्वतःचा एक शेर ऐकवला-

जो बात कहते डरते है सब,
तू वो बात लिख,
इतनी अंधेरी थी ना कभी ये रात,
लिख.

साहित्यिकांनी देशाशी, संस्कारांशी प्रामाणिक राहावे

साहित्य आणि राजकारण याचे नाते काय या विषयावर ते म्हणाले की, राजकारणात रस नाही असे साहित्यिक म्हणतात, पण हे चुकीचे आहे. याचा अर्थ राजकारणात जावे असाही नाही. कारण, प्रत्येक पक्षाची स्वतःची घटना असते. साहित्यिकांनी कुठल्याच बंधनात राहू नये. मनात येईल ते लिहिता आलेच पाहिजे. साहित्यिकांनी देश, संस्कार आणि आपल्या आदर्शाशी प्रामाणिक राहावे. जे योग्य ते बोलू असा गुण हवाच, असे जावेद अख्तर म्हणाले.