
ऋषिकेश रिकामे हा नाशिकमधील विंचूर गवळी गावचा. तो केटीएचएम कॉलेजमध्ये एफवायला आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागलं आणि त्याच दरम्यान ऋषिकेशने शेतात स्वत:च्या आवाजातील पहिल्या गाण्याचा व्हिडियो मोबाईल फोनवर बनवला आणि अपलोड केला.
कोरोनामुळे वातावरण नकारात्मक होतं. अनेकांनी जवळची माणसं गमावली होती. सर्वांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. अशा वेळी ऋषिकेशच्या आवाजात काळजाला भिडणारे गीत लोकांना ऐकायला मिळाले. देवाविना माणसाची जिंदगानी एकटी… असे या गाण्याचे बोल आहेत. लोकांना हे गाणे फारच आवडले. बस्स, तेव्हापासून ऋषिकेश चर्चेत आला. त्याला प्रेरणा मिळाली. त्याने गाण्यांचे असे कित्येक व्हिडियो तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले. आज यू-टय़ूबला त्याचे एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत, तर इन्स्टाग्रामवर त्याचे 50 हजार फॉलोअर्स आहेत. ऋषिकेशची लहान बहीण कावेरी त्याच्या गाण्याचे मोबाईलमध्ये शूटिंग करते.
गायनाची आवड ऋषिकेशला लहानपणापासूनच लागली. त्याचे वडील त्याला भजनाच्या कार्यक्रमाला घेऊन जायचे. ही आवड पुढे वाढत गेली. आज तो वडिलांना शेतीच्या कामात मदत करतानाच संगीतविशारदचे शिक्षण घेत आहे. त्याला उपशास्त्राrय संगीत, गझल, ठुमरी तसेच लोकगीतं आवडतात.
हिरव्या शिवारातून अन् शेताच्या बांधावरून सप्तसूरांची तान घेणारा नाशिकचा ऋषिकेश रिकामे सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. ऋषिकेश शेतात गाणं रेकॉर्ड करून यू-टय़ूबला अपलोड करतो. त्याच्या प्रत्येक गीताला नेटिजन्स भरूभरून दाद देत आहेत. त्यामुळे दिवसागणिक ऋषिकेशचा उत्साह वाढत आहे. अस्सल मातीतल्या या मंजूळ आवाजाने साऱयांवर गारूड केलं आहे.
सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. आपल्याला एकाच वेळी अनेकांपर्यंत पोचता येते. माझी गाणी यू-टय़ूबला अपलोड करायला सुरुवात केली. आतापर्यंत मी 130 व्हिडियो तयार केले आहेत. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. जसं जमेल तसं गाणं मी शूटिंग करून अपलोड करतो. – ऋषिकेश रिकामे
रिऑलिटी शोसाठी प्रयत्न पण…
गाण्याची आवड असल्यामुळे ऋषिकेश एका रिऑलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. नाशिकमधून निवड झाल्यावर मेगा ऑडिशनसाठीही त्याला बोलावणे आले होते. मात्र तिथे गेल्यावर त्याची मेगाऑडिशन झाली नसल्याचे ऋषिकेशने सांगितले. त्यानंतर त्याने स्वत:चे गाण्याचे व्हिडियो बनवून सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली.


























































