नाशिक- मागणी वाढल्याने कोथिंबीर 155 रुपये जुडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकमध्ये पावसामुळे आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांचे दर वधारले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीची बुधवारी 155 रुपये प्रतीजुडी अशा कमाल दराने विक्री झाली. दोन आठवडय़ात भावात 25 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे.

ज्येष्ठा गौरींचे आगमन व गणेशोत्सवामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात संततधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून आवक घटल्याने दरात सुधारणा झाली आहे. बुधवारी संध्याकाळी नाशिकच्या बाजार समितीत 73 हजार 800 जुडय़ा कोथिंबिरीची आवक होती. गावठी कोथिंबिरीला किमान 40, कमाल 155 व सरासरी 95, तर हायब्रीडला किमान 30, कमाल 147 व सरासरी 80 रुपये जुडी भाव मिळाला.

मेथीची आवक बुधवारी 10 हजार 500 जुडय़ा, दर सरासरी 40, कमाल 63 पुकारला गेला. शेपूची आवक 8 हजार 900 जुडया, तर दर कमाल 27 व सरासरी 20 रुपये प्रती जुडी होता. कांदापातीची आवकही 6 हजार जुडयांच्याच घरात होती, तर दर कमाल 34 व सरासरी 28 रुपये मिळाला.