
दरवर्षी तिसऱया श्रावणी सोमवारी राज्यभरातून आलेल्या हजारो शिवभक्तांमुळे फुलणारा त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्ग यंदा सुनासुना होता. डोंगररांगा आणि हिरव्यागार भातशेतांमधून जाणाऱया या पायवाटांवरून जलदगतीने चालणारे आबालवृद्ध, ’बम् बम् भोले’च्या गजरामुळे परिसरात जाणवणारा चैतन्याचा स्रोत यावेळी हरवला होता.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी गर्दी टाळणे हाच उपाय आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प भाविकांना यावर्षी पूर्ण करता आला नाही. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आज प्रदक्षिणा मार्गाच्या सुरुवातीलाच कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. तिर्थराज कुशावर्त, प्रयागतीर्थ परिसर आणि त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बॅरिकेडिंग केलेले होते. दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक येथे प्रदक्षिणेसाठी हजेरी लावतात. मात्र, यंदा कुणीही दाखल होऊ शकले नाही. त्यामुळे प्रथमच तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी नसल्याने येथे शुकशुकाट होता. त्र्यंबकेश्वरवासीयांनी देखील केवळ मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले.
श्री त्र्यंबकेश्वराच्या ऑनलाईन दर्शनाचा लाभ
त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील महादेव मंदिरातून ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हा न्यायाधीश एम. एस. बोधनकर यांनी मान्यता दिल्यानंतर तयारी करण्यात आली. www.trimbakeshwartrust.com या संकेतस्थळाच्या होमपेजवर ऑनलाईन दर्शनाची लिंक उपलब्ध आहे. सकाळी 8 ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत किमान बारा तास हे ऑनलाईन दर्शन सुरू असल्याची माहिती विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी दिली.


























































