राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत,यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या व वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. महाराष्ट्रातील रस्त्यांच्या 5 हजार 500 कोटींच्या कामांना मंजुरी दिल्याचे ते यावेळी म्हणाले.

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनविषयक तसेच विविध परवान्यांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.

या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार उपस्थित होते.

वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग

संत तुकाराम तसेच संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग पंढरपूरपासून आळंदी व पंढरपूरपासून देहूपर्यंत हा महामार्ग असेल. दोन्ही मिळून भाग आहेत. त्यातील तीन भागात काम सुरू आहे. त्यासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च येईल. या महामार्गाच्या बाजूला पायी चालण्यासाठी देखील जागा असेल. वारकऱ्यांच्या पायांना चटके बसू नयेत यासाठी त्यावर गवत लावण्यात येईल. यात केवळ जमीन संपादनाचे मुद्दे आहेत.

चांदणी चौकात पूल

पुण्यातील चांदणी चौकातील पूलासाठी 400 कोटी रुपयांचा खर्च येईल. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच आपण चर्चा करणार आहोत. महामार्गाचे काम येत्या दोन महिन्यात देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

मनोहर जोशींची भेट

मुंबई दौऱयावर आलेल्या नितीन गडकरी यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

सुरत- बंगळूरू मार्ग

देशाच्या उत्तर भागातून येणारी वाहने मुंबई, पुण्यातूनच दक्षिणेकडे जात असतात. मात्र वेगवान वाहतुकीसाठी सुरतमधून नवीन मार्ग बांधण्यात येणार आहे. नाशिक, नगर, सोलापूर मार्गे तो हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू असा जाईल.

मुंबई- दिल्ली बारा तासात

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे देखील दीड वर्षात पूर्ण होईल. हा पूर्णपणे ग्रीन हायवे असेल त्यामुळे मुंबई ते दिल्ली हे अंतर केवळ 12 तासात कापणे शक्य होणार असल्याचेही गडकरी म्हणाले.