प्राध्यापकाचा हात छाटला, 6 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमधील प्राध्यापक टी.जे.जोसेफ यांचा हात छाटल्याप्रकरणी विशेष एन.आय.ए. न्यायालयाने 6 जणांना दोषी ठरवलं आहे तर 5 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. जुलै 2010 मध्ये न्यूमन कॉलेजचे प्राध्यापक टी.जे.जोसेफ यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये त्यांचा हात छाटण्यात आला होता. जोसेफ यांनी परीक्षेसाठी एक प्रश्नपत्रिका तयार केली होती. यामधील एक प्रश्न हा मोहम्मद पैगंबराचा अपमान करणारा होता असा आरोप हल्ला करणाऱ्यांनी केला होता.

सदर प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. हा खटला दोन टप्प्यांमध्ये चालवण्यात आला होता. 31 आरोपींपैकी 13 आरोपी हे 2015 साली दोषी ठरवण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात 11 आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला होता. यातील 6 जणांना दोषी ठरवण्यात आले तर 5 जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले. एमके नासर, साजिल. एमके नौशाद, पी.पी.मुहामदकुंजू आणि पीएम अयूब यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या सगळ्यांना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

सगळे आरोपी हे बंदी घालण्यात आलेली संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. एर्नाकुलम जिल्ह्यातील मुवाट्टूपुळामध्ये 4 जुलै 2010 रोजी प्राध्यापक जोसेफ हे रविवारच्या प्रार्थनेनंतर घरी परतत होते. यावेळी हल्लेखोरांनी जोसेफ यांना त्यांच्या गाडीतून खेचून काढले होते. हल्लेखोरांनी जोसेफ यांच्यावर हल्ला करत त्यांचा उजव्या हाताचा पंजा छाटला होता. या कृत्यात सहभागी असलेला मुख्य आरोपी ज्याने प्राध्यापकांचा पंजा छाटला होता तो सवाद अद्याप फरार आहे. सवादवर 10 लाख रुपयांचे बक्षिस असून तो अद्याप सापडलेला नाहीये. तो अद्याप न सापडणे हे तपास यंत्रणांचे अपयश असल्याचा आरोप प्राध्यापक जोसेफ यांनी केला होता. ज्यांना अटक करण्यात आली होती ती निव्वळ शस्त्रे असून ती चालवणारे हात अद्याप मोकाट असल्याचं जोसेफ यांनी म्हटले होते. हिंदुस्थानातील तपास यंत्रणा या हल्ल्यामागील खरे आरोपी शोधून काढू शकत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे.