
रस्त्याच्या कडेला पडलेल्या तीन दिवसांच्या मुलीला घरी आणलं. तिला आईची माया दिली, नवीन आयुष्य दिलं. पण त्याच मुलीने संपत्ती आणि प्रेमसंबंधांसाठी आईला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजलक्ष्मी कर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी मुलगी अल्पवयीन असून, इयत्ता आठवीत शिकत आहे. दोन मित्रांच्या मदतीने तिने आईच्या हत्येचा कट रचला. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह तिच्या दोन्ही मित्रांना अटक केली आहे. ओडिशातील पारलाखेमुंडीमध्ये ही खळबळजनक घटना घडली.
राजलक्ष्मी यांना मुलीने कथितरित्या आधी झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर उशीने तोंड दाबून त्यांची हत्या केली. यानंतर राजलक्ष्मी यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. राजलक्ष्मी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगत आलं होतं. भुवनेश्वरमध्ये राजलक्ष्मी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वकाही मुलीच्या प्लाननुसार सुरू होतं. मात्र मुलीची एक तिला महागात पडली आणि थेट तुरुंगात गेली.
राजलक्ष्मी यांच्या अंत्यसंस्कारानंतर मुलगी घरी परतली. मात्र मोबाईल भुवनेश्वरमध्येच विसरली. हा मोबाईल राजलक्ष्मी यांचे भाऊ सिबा प्रसाद मिश्रा यांच्या हाती लागला. मिश्रा यांनी मोबाईल तपासला असता इन्स्टाग्रामवरील मॅसेजमधून हत्येच्या योजनेची माहिती मिळाली. राजलक्ष्मी यांची हत्येचा कट आणि त्यांचे सोन्याचे दागिने, रोकड लुटण्याची योजना उघडकीस आली. यानंतर मिश्रा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी मुलीसह तिचे दोघे मित्र गणेश रथ आणि दिनेश साहू यांना अटक केली.