
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे केंद्र सरकारने घोषित केले. ही घटना एक घृणास्पद गुन्हा असल्याचे म्हणत मंत्रिमंडळाने घटनेच्या जलद चौकशीचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. मंत्रिमंडळाने हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळले.
मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारने लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाला दहशतवादी हल्ला घोषित करत शोक व्यक्त केला. या बैठकीत मंत्रिमंडळाने हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल तीव्र शोक व्यक्त करणारा आणि पीडितांना श्रद्धांजली वाहणारा ठराव मंजूर केला. दोषींची लवकरच ओळख पटवण्यात येईल आणि त्यांच्यावर विलंब न करता कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.


























































