
सामान्य लोकांना गंडा घालणाऱ्या सायबर ठगांनी आता थेट वकिलांनाच चुना लावल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या वकिलांची सायबर ठगांनी लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
क्लायंट असल्याचे भासवून एका तरुणीच्या कस्टम क्लिअरन्सच्या नावाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकिलाची 2 लाख 88 हजार 700 रुपयांची फसवणूक करण्यात आली. दुसरीकडे, उच्च न्यायालयाच्या एका वकिलाला त्याच्या घराचे पाणी कनेक्शन तोडण्याच्या नावाखाली फसवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेले सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील त्यांच्या कुटुंबासह लक्ष्मीनगर परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे त्यांची एक तरुणीशी ओळख झाली. या तरुणीने आपण कॅलिफोर्नियात राहत असल्याचे वकिलाला भासवले. तसेच ती काही दिवसांत हिंदुस्थानात येणार असल्याचे तिने सांगितले. नियोजित तारखेला सकाळी 9.30 वाजता मुंबई कस्टम विभागातून एका महिलेने वकिलाला फोन केला. तुमची कॅलिफोर्नियातील क्लायंट अॅलन दिवा सध्या मुंबई विमानतळावर पोहोचली असून सध्या कस्टम कार्यालयात आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत फसवणुकीची प्रक्रिया सुरू झाली.
दुसरी घटना प्रीत विहार येथे राहणाऱ्या उच्च न्यायालयाच्या वकिलासोबत घडली. फोन करणाऱ्याने जल विभागातून बोलत असल्याचा दावा केला आणि बिल जमा न केल्यास पाण्याचे कनेक्शन कापले जाईल असे सांगितले. मात्र मीटरमध्ये बिघाड आहे आणि पाण्याचा वापर सरासरी आहे, जो सवलतीपेक्षा जास्त असू शकत नाही. त्यामुळे बिलाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे वकिलांनी सांगितले. फोन करणाऱ्याने वकिलाला जल बोर्ड अॅप डाउनलोड करून 12 रुपये जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे वकिलाने केल्यानंतर त्यांच्या युको बँक खात्यातून दोन हप्त्यांमध्ये 1,73,000 रुपये काढण्यात आले.