
निळा ड्रमनंतर आता हिरवी पेटी चर्चेत आली असून आणखी एका भयंकर हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह घरातील पेटीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनिता चौधरी असे या महिलेचे नाव आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील मैहरमधील महाराजा नगर येथील आंध्र टोलामध्ये ही घटना घडली. पतीच्या निधनानंतर अनिता चौधरी घरी एकटीच राहत होती. तिचे दोन्ही मुलगे मुंबईत नोकरी करतात तर मुलगी राजस्थानमध्ये मावशीकडे राहते. अनिता 27 ऑगस्टपासून बेपत्ता होती. अनिताचा भाऊ संतोष चौधरीने देवीजी चौकी येथे ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.
संतोष एका नातेवाईकासह अनिताच्या घरी गेला. त्याने दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता घरातून दुर्गंधी येत होती. तसेच घरातील हिरव्या पेटीच्या आसपास रक्ताचे डाग दिसले. संतोषने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पेटी उघडली असता आत अनिता मृतदेह कपड्यात गुंडाळलेला आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.