प्राचार्यांकडून सतत छळ, प्राध्यापिकेने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रक्ताने लिहिले पत्र; राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी

महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून सतत सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका महिला प्राध्यापिकेने थेट जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रक्ताने निवेदन लिहिले आहे. तसेच, राष्ट्रपतींकडे कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगीही मागितली आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला प्राध्यापिकेने महाविद्यालय व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत.

मूळ बुलंदशहर येथील रहिवासी असलेली पीडिता 2022 मध्ये बागपतमधील हजारी लाल इंटर कॉलेजमध्ये रुजू झाली. सोमवारी, प्राध्यापिका तिच्या कुटुंबासह आणि काही नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. महाविद्यालयात नियुक्ती झाल्यापासून तत्कालीन प्राचार्य आणि सध्याचे व्यवस्थापक राजेंद्र सिंह भाटी हे तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत आहेत, असा पीडितेचा आरोप आहे.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात शिक्षिकेच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने लोक जमले आणि न्यायाची मागणी करत महाविद्यालय व्यवस्थापकाविरुद्ध घोषणाबाजी केली. निदर्शनादरम्यान निदर्शकांनी स्वतःचे रक्त गोळा केले आणि त्या रक्ताने राष्ट्रपतींना निवेदन लिहिले. आता हा छळ सहन होत नसून संपूर्ण कुटुंबासाठी इच्छामरणाची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

पीडितेने जिल्हा प्रशासनापासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत या प्रकरणाबाबत अपील केले होते, परंतु आतापर्यंत महाविद्यालय व्यवस्थापनावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रशासकीय उदासीनतेमुळे तिला हे आत्मघातकी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, मानवाधिकार संघटनांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. बागपत जिल्हा दंडाधिकारी अस्मिता लाल यांनी निवेदन स्वीकारत पीडितेला सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.