
रीलसाठी तरुणाईचे नको ते धाडस जीवावर बेतत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. नदीच्या किनारी 9 मित्र रील बनवत असताना सर्वजण पाण्यात पडले. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत सर्व तरुणांना पाण्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी पाच तरुणांना मृत घोषित केले. चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वजण अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत.
बिहारच्या गयाजीमध्ये गुरुवारी ही घटना घडली. अकरावी आणि बारावीत शिकणारे 9 मित्र कॉलेजवरून घरी परतत होते. यादरम्यान नदी पुलावर उभे राहून सर्वजण रील बनवत होते. रील बनवताना सर्वांचा तोल गेला आणि ते नदीत पडले. सर्वजण खोल पाण्यात बुडू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तरुणांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनी सर्वांना बाहेर काढले. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता पाच जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.