पाटणामध्ये जदयू नेत्यांची गोळ्या झाडून हत्या; संतप्त जमावाने केला रास्ता रोको

बिहारची राजधानी पाटणामध्ये जदयू नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पुनपुन येथे जदयूचे युवा नेते सौरभ कुमार यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने पाटणा -गया महामार्गावर रास्ता रोको करत हा मार्ग अडवला होता.

पुनपुन येथे एका लग्नसोहळ्यातून घरी परतत असताना बुधवारी रात्री त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. बढईया कौल येथील एका लग्न सोहळ्यातून सौरभ कुमार आपल्या साथीदारांसह परतत असताना पुनपुनजवळ चार दुचाकीस्वारांनी सौरभ कुमार यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. सौरभ कुमार यांच्या डोक्याला दोन गोळ्या लागल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेल्या मुनमुन यांना तीन गोळ्या लागल्या असून त्या गंभीर आहेत. त्यांच्यावर पाटणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पाटलीपुत्र येथील राजदच्या लोकसभेच्या उमेदवार आणि लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांनी सौरभ कुमार यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथक दाखल झाले आहे.