
गुजरातमध्ये गुरुवारी भूकंपाचे तीन धक्के बसले. राज्याच्या वेगवेगळ्या भागात अवघ्या चार तासांत तीन भूकंप जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. गुजरातमधील तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चार तासांत तीन भूकंपाचे धक्के जाणवले. सलग तीन भूकंपांनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
दाहोद जिल्ह्यात सकाळी भूकंपाची मालिका सुरू झाली. दाहोदमध्ये सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचा जाणवला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.5 इतकी होती. भूकंपाचे केंद्र दाहोद शहराच्या पश्चिम-नैऋत्येस अंदाजे 34 किलोमीटर अंतरावर होते.
दुसरा भूकंपाचा धक्का दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी कच्छ जिल्ह्यातील भचौ परिसरात बसला. भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल इतकी होती. भचौच्या वायव्येस सुमारे 12 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते.
बोटाड जिल्ह्यात दुपारी 3 वाजून 8 मिनिटांनी 3.4 रिश्टर स्केलचा तिसरा भूकंप नोंदवण्यात आला. भूकंपाचे केंद्र बोटाड शहरापासून सुमारे 28 किलोमीटर नैऋत्येस असल्याचे वृत्त आहे.

























































