
तब्बल चार वर्षांनंतर अभिनेता शाहरुख खान कमबॅक करत असून त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला आहे. ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे सुरुवातीपासून हिंदुत्ववादी संघटनांनी ‘पठाण’च्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी थिएटरबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
प्रदर्शनानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून देशभरात चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रातही काही ठिकाणी तीव्र पडसाद उमटले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुणे, धुळे, मिरज येथे चित्रपटाचे पोस्टर फाडून निषेध व्यक्त केला तसेच ‘पठाण’चे प्रदर्शन रोखण्याची मागणी केली.


























































