मुंबई मराठी पत्रकार संघात नाटकाची तिसरी घंटा वाजणार! प्रायोगिक रंगभूमीसाठी व्यासपीठ, प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आता नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे. महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाटय़ शुक्रवार’ या अभिनव उपक्रमाची घोषणा मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी दर्जेदार प्रायोगिक नाटय़ाचे मोफत सादरीकरण होणार आहे. नवोदित व प्रायोगिक रंगकर्मींसाठी हे व्यासपीठ खुले असणार असून नाटय़प्रेमींना नाटय़प्रयोगांचा निःशुल्क आनंद घेता येणार आहे.

 मराठी प्रायोगिक रंगभूमीला बळ देणे आणि नव्या प्रयोगशील नाटकांना मंच मिळवून देणे हा ‘नाटय़ शुक्रवार’ उपक्रमाचा मूळ हेतू आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच 25 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, संजय मोने, दिग्दर्शक-लेखक मिलिंद पेडणेकर आणि इंडियन ऑईलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉ. अभिषेक कुमार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. लोकमान्य सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि अभिनेते दिग्दर्शक रविंद्र देवधर यांनी ही माहिती दिली.

या उपक्रमात सादरीकरण करणाऱया नाटय़संस्थेला पत्रकार संघातर्फे 10 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच संघाचे सभागृह पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या नाटय़ उपक्रमात ज्यांना आपल्या कलाकृती सादर करायच्या आहेत त्यांनी 9769664464,  9422344555 किंवा 9322492629 या क्रमांकावर संपर्क साधावा.