अंध कवीची ‘डोळस’ प्रतिभा, अनिल साबळे यांचा प्रेरणादायी प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीवन म्हणजे नियतीचा एक डाव जणू. प्रत्येक वेळी मनासारखे पत्ते हातात येतीलच असे नाही. जे काही हातात पडलंय त्याची खंत न करता स्वतःचा वेगळा डाव जो मांडून जो जिंकतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. अंध कवी अनिल साबळे यांचे आयुष्य याचे उत्तम उदाहरण आहे. वयाच्या तिसऱया वर्षापासून आलेल्या पूर्ण अंधत्वावर मात करून त्यांनी जीवनाची वाट प्रकाशमान केली. पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मराठीचे प्राध्यापक बनले. याच प्रवासात कवी, गझलकार ही ओळखही निर्माण केली. या ‘डोळस’ प्रतिभेचे कौतुक करावे तितके कमीच.

नवी मुंबईत राहणारे अनिल साबळे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. दृष्टिहीन साबळे यांना शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुढे विभावरी शिरुरकर यांच्या साहित्यावर पीएच.डी. केली. साबळे सांगतात, अंध असल्याने पीएच.डी. करण्यात अनंत अडचणी आल्या. तासन्तास लायब्ररीत बघून संदर्भग्रंथ वाचावे लागायचे, पण वाचणार कसं? मदतनिसांवर अवलंबून राहावे लागायचे. असे एक ना अनेक अडथळे… ग़ेली काही वर्षे ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात मराठी विषय शिकवत आहेत. त्यासोबतच त्यांचे काव्य, गझल लेखन सुरू आहे. त्यांचे गझलांचे दोन अल्बम प्रकाशित झाले आहेत. ‘इमानदारी’ हा आठ गझलांचा पहिला अल्बम 2010 साली आला. त्यानंतर ‘गझलेस छंद तुझिया’ हा दुसरा अल्बम त्यांनी 2020 मध्ये प्रकाशित केला. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, वैशाली देशपांडे, धनक्षी देशपांडे, मंदार आपटे अशा गायकांनी त्यांच्या गझलांना स्वरसाज दिला आहे. या दोन्ही अल्बमच्या प्रकाशनात भगवंत नार्वेकर आणि सोमेश नार्वेकर या संगीतकार मित्रांची मोलाची साथ असल्याचे अनिल |साबळे सांगतात.

कवी साबळे यांना दिसत नाही, पण त्यांचे अंतःचश्रू सदैव उघडे असतात. त्यांचे विचार काव्य, गझल बनून कागदावर उमटतात. त्यांची गझल बोलते…

रेखीव माणसांची दुनिया हवी कशाला?
माणूसपणात आहे दुनिया सबंध तुझिया

त्यांच्या गझलांना सामाजिक आशयाचं कोंदण आहे. प्रेम- विरहाचा स्पर्श आहे.
काळोखी वेदनांनी भरलेलं आयुष्य घेऊन फिरतोय साऱया रेल्वेतून,

पटरीवरचं, घाटावरचं, बोगद्यातलं, स्टेशनास्टेशनावरचं मरण चुकवतो भुकेचे डोळे बनवून.

अशी काळोखी वेदना त्यांच्या शब्दांतून उमटते. येत्या फेब्रुवारी महिन्यात साबळे यांचा तिसरा गझल अल्बम ‘रातराणी’ येणार आहे.

लय भारी जादू… नुडल्स हवेत गोठले!

सध्या देशविदेशात कडाक्याची थंडी पडली आहे. काही ठिकाणी तापमान इतके खाली गेलंय की, पदार्थ गोठू लागलेत. उणे 34 डिग्री सेल्सिअस तापमानात गोठलेल्या, नूडल्सचा आणि नुडल्समध्ये अडकून हवेतच तरंगणाऱया चमच्याचा फोटो व्हायरल होत आहे. गोमाऊंट वॉशिंग्टन वेधशाळेच्या ट्विटर हँडलवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हाडं गोठवणाऱया थंडीने आमच्या निरीक्षकाला या नुडल्सचा एक घासही खाऊ दिला नाही, अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.