डॉक्टर असल्याचे सांगत इंजेक्शन दिले; तरुणीचा मृत्यू, वाशी पोलिसांनी वॉर्डबॉयला बेड्या ठोकल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉक्टर असल्याचे सांगून संदेश पाष्टे या वॉर्डबॉयने एका २१ वर्षीय तरुणीला इंजेक्शन दिले. त्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या बोगस डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या आहेत. मानखुर्द येथे राहणारा पाष्टे अंधेरी येथील एका नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करीत होता. हे काम करता करता तो मानखुर्दमध्ये डॉक्टर असल्याचे सांगून रुग्णांवर उपचारही करीत असे. मृत झालेल्या तरुणीच्या पालकांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी पाष्टेला घरी बोलावले होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

वाशी येथे राहत असलेल्या प्रचिती भुवड (२१) या तरुणीला हार्मोनलचा आजार होता. या आजारावर उपचार करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी ओळखीच्या माध्यमातून संदेश पाष्टेला घरी बोलावले. त्यानुसार पाष्टे गुरुवारी ५ फेब्रुवारी रोजी घरी आला. त्याने तिची तपासणी करून एक इंजेक्शन दिले. त्यानंतर काही वेळातच प्रचितीची प्रकृती बिघडली. त्रास वाढत असल्याचे लक्षात येताच कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता पाष्टेने दुसरे इंजेक्शन दिले. मात्र यानंतर तिची अवस्था अधिक गंभीर झाली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना संशय आला. प्रचितीचे वडील भिकुराम भुवड यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

उपचारासाठी घेतले १५ हजार रुपये

वॉर्डबॉय पाष्टेने प्रचितीच्या उपचारासाठी १५ हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित आजारावरील उपचारासाठी साधारणपणे कमी शुल्क आकारले जाते. मात्र डॉक्टर असल्याचे भासवून मोठी रक्कम घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रचितीला नेमकी कोणती इंजेक्शन्स देण्यात आली, ती औषधे कायदेशीर होती का, तसेच डोस चुकीचा होता का, याबाबत सखोल तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, असे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले.

बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

संदेश पाष्टे हा डॉक्टर नसतानाही उपचार करत असल्याचे स्पष्ट झाल्याने बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी उपचार घेताना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय पात्रता आणि नोंदणी तपासणे आवश्यक आहे. काही संशयास्पद आढळले तर तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी. बनावट डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नवी मुंबई पोलिसांनी दिला आहे.