गुणवत्तेत तडजोड नाहीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्यापासूनच स्वयंपाकाची आवड असल्याने त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग होत होते. सकाळची घरातील सर्व कामे आटोपल्यानंतर दिवसभर वेळ कसा घालवायचा, असा प्रश्न पडायचा. मग आपल्या आवडीचं रूपांतर व्यवसायात करत घरातच विविध प्रकारच्या शेव, भडंग, फरसाण असे वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून ते स्थानिक बाजारापेठेत विक्रीसाठी ठेवले. पदार्थांची चव आणि गुणवत्तेमुळे या पदार्थांना मोठी मागणी वाढली. बारा वर्षांपूर्वी घरातूनच सुरू केलेला हा व्यवसाय आज एका कारखान्यापर्यंत आला आहे. इतकेच नाही तर राज्यभरातील डी-मार्टमध्ये ‘नंदिनी फरसाण’ विक्रीसाठी उपलब्ध आहेच; परंतु ‘नंदिनी फूड प्रॉडक्ट’ हा ब्रॅण्ड सोलापुरात नावारूपाला आला असल्याचे या ब्रॅण्डच्या मालक शांती विष्णू भट मोठय़ा अभिमानाने सांगतात.

आपल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करत अर्थाजन करायचे; पण आपल्याबरोबरच इतर चारजणांनाही रोजगार द्यायचा असे ठरवले. त्यासाठी सुरुवातीला घरातूनच स्वतः चार प्रकारच्या शेव, मका चिवडा, साबुदाणा चिवडा, मसाला शेंगा असे वेगवेगळे बारा प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून ते परिसरातील दुकानदार, जवळचे नातलग व मित्रपरिवाराला दिले. त्यांना पदार्थांची चव व गुणवत्ता आवडली. त्यानंतर या लोकांनी हे पदार्थ बाजारपेठत विक्रीस ठेवण्यास सल्ला दिला. त्यानुसार परिसरातील स्वीट होम, ग्राहक भंडार, स्टॉल व साई सुपर मार्केटमध्ये दिले असता त्यांना ते आवडले. घरगुती असल्यामुळे त्यावेळी कोणतंही नाव नसल्याने ते प्लेन पाकिटामध्ये देत. हे पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरल्याने त्यांची मागणी वाढू लागली.

कामाचा मोठा व्याप वाढल्याने खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी कारखाना सुरू केला आणि सर्व खाद्यपदार्थांची नंदिनी फूड प्रॉडक्ट या छापील पाकिटामधून विक्री होऊ लागली. याला दहा वर्षे झाली. मात्र, खाद्यपदार्थांची चव आणि गुणवत्ता तीच राहिली. सुरुवातीला शंभर, दोनशे किलो असे खाद्यपदार्थ तयार करून ते पदार्थ 40 रुपये किलोदराने विकले. आता दररोज पाच टन खाद्यपदार्थ तयार केले जातात. शून्यातून सुरू केलल्या या व्यवसायाची आता करोडो रुपयांमध्ये उलाढाल होतेय. दिवाळीच्या कालावधीत दिवाळी फराळही तयार केला जातो. त्याचीही मोठी उलाढाल होते. सध्या कारखान्यामध्ये 50 कामगार आहेत.

पाच वर्षांपूर्वी सोलापुरात डी-मार्टची शाखा सुरू झाल्यानंतर त्यांनी बाजारपेठेतील आमच्या खाद्यपदार्थांची विक्री पाहून त्यांनी तुमची उत्पादने आम्हाला द्या म्हणून फोन करून मागणी केली. येथील शाखेमध्ये आमचे सर्व पदार्थ विक्रीस आहेत, पण राज्यभरातील डी-मार्टच्या शाखांमध्ये आमचे फरसाण जाते. बेळगावलाही जाते. याशिवाय रिलायन्स मार्ट व टाटा मार्टमध्येही ती उपलब्ध आहे.

पूर्ण ऍटोमॅटिक मशीनमधून मालाचे उत्पादन वेगाने होते; परंतु चव आणि गुणवत्ता राहत नाही. त्यामुळे कारखान्यामध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सेमी ऍटोमॅटिक मशीनचा वापर केला जातो. जुन्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाफ करत उत्पादने घेतली जातात. आमच्यासाठी पदार्थांची चव महत्त्वाची आहे.

खाद्यपदार्थ तयार करताना त्यांचा दर्जा आणि सुरक्षितता यांची योग्य काळजी घेतली जाते. उत्कृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरला जातो. खाद्यपदार्थ तेलकट नसतात, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही खाऊ शकतो. पाण्यापासून सर्व जिन्नसांची लॅब टेस्ट होत, त्यामध्येही आम्ही पात्र ठरतो. अन्नऔषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन केले जाते. ग्राहकांचे समाधान, खाद्यपदार्थांची चव, गुणवत्ता आणि वाजवी दर याच सूत्राचे आम्ही कसोशीने पालन करत असल्याचे शांतीताई सांगतात.

शब्दांकन – विदुला झगडे