
नवरात्र ही जगातील शक्ती तत्त्वाची पूजा-अर्चना करण्याची साधना आहे. या नऊ दिवसांमध्ये शक्ती तत्त्वाची देवी स्वरूपात पूजा केली जाते. योगाभ्यास हीसुद्धा एक शक्ती साधनाच आहे
शक्ती तत्त्वालाच पुराणांमध्ये आदिमाया आणि योगशास्त्रामध्ये प्रकृती असे म्हटले आहे. ही प्रकृती सत्व, रज आणि तम अशा तीन गुणांनी युक्त असते. तथापि आपल्या मूळ स्वरूपात ही त्रिगुणातीत असते. सृष्टी म्हणजे या प्रकृती तत्त्वाचे व्यक्त स्वरूप होय. या विश्वातील प्रत्येक वस्तू ही प्रकृतीपासूनच उत्पन्न होते. या शक्तीचे अव्यक्त, परंतु सदैव विद्यमान असणारे स्वरूप म्हणजेच काली. सांख्य आणि योगशास्त्रामध्ये प्रकृतीपासून विश्वाचे सर्जन होण्याची क्रिया वैज्ञानिक दृष्टीने विशद केलेली आहे.
प्राणायाम अन् शक्ती उपासना
नवरात्री म्हणजे शक्तीच्या नऊ रूपांची उपासना. योगाभ्यासामध्ये प्राणायाम म्हणजे ही शक्तीचीच उपासना आहे. प्राण या शब्दाचा अर्थ आहे जीवनशक्ती. पाच मुख्य प्राण आहेत ज्यांना पंचप्राण म्हटले जाते. अर्थात प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. याशिवाय शरीरातील इतर अनेक लहान-मोठी कार्य करण्यासाठी किंवा होण्यासाठी शक्तीच्या अनेक विभिन्न रूपांची गरज लागते त्यांना उपप्राण असे म्हटले आहे. या प्राणशक्तीचे संचलन शरीरातील विभिन्न नाडय़ांमधून सुरळीतपणे व्हावे यासाठी प्राणायामाचा अभ्यास केला जातो.
नाडीशुद्धी अन् हठयोग
प्राणशक्तीचे संचालन नाडय़ामधून सुरळीतपणे होण्यासाठी नाडीशुद्धी करावी लागते. ही नाडीशुद्धी, आसन आणि प्राणायामाच्या अभ्यासाने होते. या अभ्यासालाच हठयोग असे म्हटले आहे. ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. सूर्य आणि चंद्र नाडय़ांची शुद्धी होऊन शरीरातील विभिन्न शक्तींचे संतुलन व्हावे वा वृद्धी व्हावी म्हणून केला जाणारा अभ्यास म्हणजे हठयोग होय.
कुंडलिनी साधना
योगाभ्यासाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे कुंडलिनी शक्तीची जागृती. कुंडलिनी शक्ती मुलाधार चक्रामध्ये सुप्तावस्थेत असते. योगाभ्यासाचे काही विधी केल्याने आपल्या शरीराच्या नाडय़ांची शुद्धी होते आणि ही कुंडलिनी शक्ती जी अधोमुख असते ती जागृत होते आणि सुषुम्ना नाडीतून सहस्त्रार चक्रापर्यंत पोहोचते. एकदा कुंडलिनी शक्तीची जागृती सुरू झाली म्हणजे योग साधकाची अध्यात्म मार्गावर किंवा मोक्षमार्गाकडे प्रगती अतिशय वेगाने सुरू होते.
शक्तीचा कधीही विनाश होत नाही. शक्ती ही अजर, अमर आहे. जगातील शक्ती केवळ एका रूपातून दुसऱया रूपामध्ये रूपांतरित होत राहते आणि हाच ऊर्जा अक्षय्यतेचा सिद्धांत. या विश्वातील प्रकृती पूर्ण आहे. ती निर्माण करता येत नाही अर्थात तिच्या उत्पत्तीची कल्पना ही मनुष्याच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. शक्तीच्या प्रभावाने जगातील सर्व कार्ये होतात आणि विश्व हे अखंड चालू राहते.
>> सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
www.bymyoga.in

































































