एक कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवादी मज्जीने 12 जणांसह केले आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्यप्रदेश नक्षलवाद मुक्त

महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा सीमाभाग सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकींमुळे नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. आता याच भागात सुरक्षा दलांनी ऐतिहासिक यश संपादित केले आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईमध्ये सुरक्षा दलांनी मोठा विजय मिळवला आहे. एक कोटींच बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर रामधेर मज्जी याने आपल्या 12 साथीदारांसह छत्तीसगडच्या बकरकट्टा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

रामधेर मज्जी हा कुख्यात नक्षली कमांडो हिडमा याचा अत्यंत जवळचा सहकारी मानला जात होता. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या चकमकीत हिडमा, त्याची पत्नी आणि अन्य चार नक्षलवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले होते. हिडमावर 10 कोटींपेक्षा जास्त बक्षीस ठेवण्यात आले होते. सुरक्षा दलांसाठी हा मोठा विजय होता. आता त्याचा जवळचा सहकारी रामधेर मज्जी याने आपल्या 12 साथीदारांसह आत्मसर्पण केल्यामुळे MMC झोन असलेल्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला नक्षलवाद मुक्त घोषित करण्यात आले आहे.

आत्मसमर्पण करण्यात आलेल्या 12 माओवाद्यांमध्ये रामधेर मज्जी व्यतिरिक्त इतर तीन विभागीय उपकमांडर आणि अन्य प्रमुख नक्षलवद्यांचा समावेश आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांकडे AK-47, 30 कर्बाईन, INSAS आणि SLR सह अन्य घातक शस्त्रांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 6 महिला आणि 6 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. रामधेर मज्जीसह, चंदू उसेंडी, प्रेम, रामसिंह दादा, सुकेश पोट्टम, सागर, शिला, ललिता, जानकी, लक्ष्मी, कविता आणि योगिता यांचा समावेश आहे.