
अमेरिका, नेदरलँड, युनायटेड किंगडम येथून होत असलेल्या ड्रग तस्करीचा नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने पर्दाफाश केला. एनसीबीने तीन कारवाई करून एमडीएमए आणि एलएसडी ब्लॉट्स जप्त केले आहेत. या प्रकरणी दोघांना एनसीबीने अटक केली. डार्क वेब आणि क्रिप्टो करन्सीचा वापर करून हे ड्रगचे नेटवर्क चालवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
युरोप आणि अमेरिका येथून परदेशी औषधाची तस्करी होत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. मे महिन्यात यू.के. येथून पुण्यात एक पार्सल आले. ते पार्सल एनसीबीने ताब्यात घेतले. त्याच्यात एमडीएमएच्या गोळ्या आणि एलएसडी ब्लॉट्स होते. त्या प्रकरणी एनसीबीला एकाची माहिती मिळाली. एनसीबीने महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने पुण्यातून एकाला अटक केली. कमिशनच्या मोबल्यात तो परदेशी हॅन्डलरकडून ड्रग तस्करी करायचा.
तसेच जुलै महिन्यात एक पार्सल मुंबईत आले. ते पार्सल एनसीबीने उघडले. त्यात हायड्रोपोनिक गांजा असल्याचे समोर आले. ते पार्सल पुण्यातील एकाने पाठवल्याचे उघड झाले. अदनान एफ नावाच्या व्यक्तीला एनसीबीने ताब्यात घेतले. तो पुणे आणि काही परिसरात हाय प्रोफाईल पार्टीमध्ये गांजा पुरवत असायचा. तसेच जुलै महिन्यात आणखी एक पार्सल मुंबईत आले. त्या पार्सलमध्ये काही वस्तू होत्या. नेक मसाजर आणि मेटल फूड कॅन होते. मसाजरची तपासणी केली असता त्यात एमडीएमएच्या गोळ्या होता. ते पार्सल नालासोपारा येथील अर्जुन नावाच्या व्यक्तीने मागवले होते. त्याला काही दिवसांपूर्वी एका केंद्रीय यंत्रणाने अटक केली होती. एनसीबीने कारवाई करून 1.403 किलो एमडीएमए, 0.26 ग्रॅम एलएसडी ब्लॉट्स, 1.840 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला.

























































