NCB ने आर्यन खानला सुपर-डुपर स्टार बनवला, प्रसिद्ध दिग्दर्शकाची मार्मिक प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्यन खानवरील आरोपातून काहीच साध्य होणार नाही, मात्र NCB ने शाहरूख खानच्या मुलाला सुपर-डुपर स्टार बनविला अशी मार्मिक प्रतिक्रिया एका प्रसिद्द दिग्दर्शकाने दिली आहे. राम गोपाल वर्मा यांनी आर्यन खानच्या अटकेवर त्यांची प्रतिक्रिया दिली असून त्यांनी यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. आर्यन खान याच्या जामीन अर्जावर गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असून त्याला जामीन मिळतो का तो जेलमध्येच राहतो याची अनेकांना उत्सुकता आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की ‘एजन्सी (NCB) सकट सगळ्यांना माहिती आहे की आर्यन खानवरील आरोपातून काहीच निष्पन्न होणार नाहीये. जेव्हा केव्हा हे प्रकरण लांबवर खेचणं थांबेल तेव्हा तो बाहेर येईल.’ राम गोपाल वर्मा यांनी या प्रकरणी भरपूर ट्विट केली आहेत, ज्यातील एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की ‘शाहरूख खान याच्या सच्च्या आणि डोकेबाज चाहत्यांनी NCBचे आभार मानले पाहिजेत. कारण त्यांनी सुपट स्टारच्या मुलाला सुपरडुपर स्टार बनवलंय. मी शाहरूख खान याचा चाहता असून मला ‘जय एनसीबी’ अशा घोषणा द्याव्याश्या वाटतायत’

क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्याच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार असून जामीन न मिळाल्यामुळे आर्यन खान याला बुधवारची रात्रही तुरुंगातच काढावी लागली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) कॉड्रिला क्रूझवर कारवाई केली होती. पार्टीप्रकरणी सुरुवातीला एनसीबीने आर्यन खानसह चौघांना अटक केली होती. त्या चौघांना किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

गेल्या सुनावणीच्यावेळी आर्यनसोबत अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नूपुर सतीजा, मोहक जयस्वालच्या जामिनासाठी अर्ज दाखल केले. त्या सर्व जामीन अर्जांवर उत्तर देण्यासाठी एका आठवडय़ाची मुदत देण्यात यावी, एनसीबीचा तपास अद्याप बाकी असल्याचे विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी गेल्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयात सांगितले होते. जर आर्यनला जामीन दिल्यास त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो असे गेल्या सुनावणीच्या वेळेस एनसीबीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले होते. तसेच आरोपीच्या जामीन अर्जावर तत्काळ सुनावणी घेण्याइतकी गरज नसल्याचे सेठना यांनी न्यायालयात सांगितले होते.