एनसीबीचे पथक जळगावात; 1500 किलो गांजा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत 1500 किलो गांजा जप्त केला आहे. यात एका ट्रकमधून गांजाची पोती जप्त करण्यात आली आहेत. दोघा संशयित तस्करांना या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहेत. एनसीबीच्या कारवाईबाबत स्थानिक पोलीस देखील अनभिज्ञ असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. एनसीबीकडून देशासह महाराष्ट्र आणि मुंबईत ठिकठिकाणी धाडसत्र सुरू आहे. धाडसत्रांमध्ये एनसीबीने अनेक ड्रग पेडलर्सला ताब्यात घेतले आहे. तपासात त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्यात ठिकठिकाणी गांजा तस्करांविरोधातही एनसीबीने धडक मोहीम सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील कारवाई त्याचाच एक भाग आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे एनसीबीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने एक ट्रक अडवून त्या ट्रकमधून वाहतूक करण्यात येणारी 1500 किलो गांजाची पोती जप्त केली आहेत. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. यात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही संशयित आरोपी आंध्र प्रदेशातील असल्याची माहिती मिळाली आहे.