
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मेगागळती लागली असून दिवसेंदिवस या दोन पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या दोन पक्षांची परिस्थिती बिकट झालेली असतानाच ठाण्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. इथल्या एका नेत्याने पदाचा राजीनामा दिला आहे.
ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पुढची पावले काय असतील याबाबत अद्याप खुलासा केलेला नाहीये. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता पसरली आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून धुसफूस सुरू असून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यशैलीवर काही नगरसेवक नाराज आहे. जगदाळे यांचेही नाव या नाराज सनगरसेवकांमध्ये घेतले जात होते.
मे 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे हे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये गेले होते. आव्हाड यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस कागदावर तरी बऱ्यापैकी ताकदवान दिसत होती. वास्तवात अंतर्गत कलहामुळे ती कमकुवत झाली होती.
2014 च्या निवडणुकांपूर्वी या पक्षातील किसन कथोरे, कपिल पाटील व पुंडलिक म्हात्रेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती. वसंत डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आमदार निरंजन डावखरे भाजपमध्ये प्रवेश करते झाले. त्यांनी भाजपकडूनच कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही जिंकली. कपिल पाटील दुसऱ्यांदा खासदार झाले. आमदार पांडुरंग बरोरा यांनीही काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक हे भाजपमध्ये गेले असून गणेश नाईक आणि त्यांचे समर्थक उघडपणे भाजपमध्ये गेले नसले तरी त्यांनी भाजपला मदत करण्याची भूमिका स्वीकारलेली आहे.
आता नवी मुंबईचे नेते गणेश नाईक यांनीही “राष्ट्रवादी’ची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याने या जिल्ह्यात आमदार जितेंद्र आव्हाड हे एकमेव नेते “राष्ट्रवादी’कडे उरले आहेत. गणेश नाईक नवी मुंबईतील 52 नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.






























































