स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा, धनंजय मुंडेंची मागणी

1408
dhananjay-munde-ncp

विधानसभा निवडणूकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतदान ते मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मागील काही निवडणूकांपासून देशात ईव्हीएम मशीन हॅक होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती असून निवडणूक प्रक्रीयेतून निष्पक्षता कायम रहावी या दृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये व मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावेत, तसेच या दोन्ही जागांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा 21 ऑक्टोबर 2019 ते 24 ऑक्टोबर 2019 पर्यंत बंद करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या