जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा ‘जवाब दो मोर्चा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी शहरातील स्टेशन रोडवरील जि.प. निवासस्थान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर करण्यात आले. आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

प्रचंड घोषणांचा पाऊस पाडत भाजपच्या मोदी सरकारने सत्ता घेतली. सत्तेवर आल्यानंतर चाडेचार वर्षात काहीही न करता, पून्हा एकदा आश्वासनाची खैरात वाटण्यास सुरुवात झाली आहे. यापासून सावध राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी यावेळी केले. मोठा गावावाजा करुन मोदी सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजना, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्कील इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅन्डअप इंडिया, दीन दयाल ग्रामीण कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना या योजना अपयशी ठरल्याकडे यावेळी अनेक मान्यवरांनी लक्ष वेधले. सरकारने आता या योजना बंद कराव्यात. दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने रोजगार उपलब्ध करुन न देता बेरोजगारीमध्ये वाढ केली आहे. केवळ आश्वासन न देता बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी गव्हाणे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. वक्त्यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव, माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर, मारोतराव बनसोडे, संतोष बोबडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चातील नेत्यांच्या व कार्यकत्र्यांच्या हातात ‘जवाब दो’ चे फलक दिसत होते.