‘रत्नसुंदर’वरील ‘या’ चर्चेमुळे शरद पवार खुलले, राजकारण्यांनी कान टवकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar-at-ratnasundar

उदय जोशी । बीड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या यांच्या बीडमधील भेटीमुळे राजकीय खलबते सुरू आहेत. बीड जिल्ह्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत. मात्र असे असताना पवार साहेब मात्र बीड जिल्ह्यातील दुष्काळ, पारंपारिक पिके, वाढत असलेल्या फळबागा, या विषयात रमले, धर्यशील सोळुंकेच्या शेतात 35 एकरवरील फळबाग लागवडीचे यश ऐकून पवार अवाक झाले आणि त्यांनी कौतुकही केलं.

बीड मध्ये मुक्कामाला थांबलेलेले शरद पवार काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्षं लागलं होतं. रत्नसुंदर या धर्यशील सोळुंकेच्या बंगल्यावर झालेल्या भोजनावेळी काय चर्चा झाली अशी उत्सुकता साऱ्यांनाच लागली होती. बंगल्यात दाखल होताच सीताफळाची बाग काय म्हणते? असा प्रश्न विचारून पवारांनी चर्चेला सुरुवात केली, धर्यशील सोळुंके हे शेती निष्ठ शेतकरी आहेत, त्यांनी तब्बल 35 एकरांवर गोल्डन सीताफळाची बाग उभी केली, दोन वर्षांपासून जोमाने पीक ही घेतात. 35 एकरावर सीताफळ उभे केल्याचे ऐकून पवार साहेब ही अवाक झाले अन कौतुकही केले. शेतीचा विषय निघाल्याने पवार अधिकच खुलले मग राज्यात कोठे कोठे सीताफळ बाग आहेत कोणाकडे किती एकर सीताफळ आहेत, कोणत्या भागात पीक जोमाने येते, यावर सविस्तर चर्चा झाल्याचं कळतं. सीताफळाची आवक कशी, मार्केट कोठे उपलब्ध होते, भाव कसा मिळतो या चर्चेत पवार रमून गेले होते.

बीड जिल्ह्यात सरासरी पावसाचे घटणारे प्रमाण, सततचा दुष्काळ, आणी या दुष्काळावर मात करण्यासाठी पर्यायी व्यवस्था, त्याचे व्यवस्थापन या वर पवार बोलले अशी देखील माहिती मिळते. मात्र तासाभराच्या या भेटीत कोणती राजकीय चर्चा झाली का हे कोडेचं आहे.