गद्दार सत्तार हाय हाय… अब्दुल सत्तारांच्या भाषण वाचनावर राष्ट्रवादीचा आक्षेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेतील चर्चेला उत्तर देताना भाषण वाचून दाखविण्यास सुरुवात केली. पण असे वाचून दाखविण्याची प्रथा नसल्याचा आक्षेप राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी  घेतला. त्यावर सत्तार यांनी सावध होत भाषणाला सुरुवात केली, मात्र जयंत पाटील सभागृहाबाहेर जाताच पुन्हा भाषण वाचून दाखविण्यास सुरुवात केली.

विधानसभेत विरोधकांच्या 293 च्या प्रस्तावाला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी हातातील कागद वाचत भाषण करण्यास सुरुवात केली. त्यावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांनी वाचून उत्तर देऊ नये. त्यावर नावे चूकू नये म्हणून वाचून दाखवत असल्याचे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिले. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे नाव तरी वाचून दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका, असा टोला जयंत पाटील यांनी मारला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी हातातील कागद बाजून ठेवत उत्तर देण्यास सुरुवात केली. पण काही वेळातच जयंत पाटील सभागृहाबाहेर गेले. पण अब्दुल सत्तार यांनी  हातातील कागदावरील माहिती वाचून दाखवत उत्तर देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पीक विमा पंपन्या शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात भरपाई देत असून उर्वरित 503 कोटी रुपयांची रक्कम पुढील 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा चांगलाच पाहुणचार मंगळवारी  महाविकास आघाडीने घेतला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर आघाडीच्या आमदारांनी मिंधे सरकार आणि सत्तारांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘किसानों के गद्दारोंको जुते मारो सालों को…’, ‘असंवेदनशील कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा…’, ‘गद्दार सत्तार हाय हाय…’, ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो…’,  ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…’, ‘पन्नास खोके एकदम ओके…’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.