‘महाराष्ट्र भूषण’च्या गर्दीमागे निवडणुकीचे राजकारण, खारघर दुर्घटनेला राज्य सरकारच जबाबदार – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारला प्रचंड शक्ती जमवून निवडणुकीच्या संदर्भात राजकारणाला अनुकुल वातावरण निर्माण करायचे होते. जो निष्काळजीपणा दाखवण्यात आला त्याची किंमत निष्पाप लोकांना द्यावी लागली. या दुर्घटनेची 100 टक्के जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज व्यक्त केले.

खारघरचा कार्यक्रम अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संघटनेने आयोजित केलेला नव्हता. प्रचंड उन्हाळा व उष्माघाताची शक्यता असतानाही हा कार्यक्रम उघड्यावर घेतला. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळेच एवढे लोक मृत्युमुखी पडले, अशी टीका शरद पवार यांनी केली.

न्यायालयीन चौकशीच हवी
खारघर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एकसदस्यीय चौकशी समिती नियुक्ती केली आहे. त्याचा उल्लेख करताना शरद पवार म्हणाले की, स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे, पण ते सरकारी अधिकारी आहेत. सरकारी अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी सत्य स्थिती पुढे येऊ शकणार नाही. त्यासाठी चौकशी मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडे सोपवून वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.