
पूर्व लडाखच्या पँगाँग सरोवरच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱयावरून हिंदुस्थान आणि चीनच्या सैन्यांकडून माघार सुरू आहे. घुसखोर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून तंबू उखाडले जात असून, टँक घेऊन सैनिक माघारी फिरत आहेत. हेलिपॅड आणि बंकर्सही चिनी सैन्याने मोडून टाकले जात असल्याचे वृत्त आहे.
एप्रिल 2020 पासून पूर्व लडाख परिसरात हिंदुस्थानी हद्दीत चिनी सैन्याने घुसखोरी केली होती. फिंगर चार आणि फिंगर आठच्या दरम्यान चीनने तळ ठोकला होता. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेचे (एलएसी) पालन करावे आणि सैन्य मागे घ्यावे यासाठी अनेकवेळा लष्करी आणि राजनैतिक पातळीवर दोन्ही देशांमध्ये बैठक झाल्या. हिंदुस्थानी लष्करानेही आपली तैनाती पँगाँग सरोवर परिसरात वाढविली. यावेळी दोन्ही देशांमध्ये ‘एलएसी’वर संघर्षही झाला होता. अखेर केंद्र सरकारने गेल्या आठवडय़ात सैन्य माघारीवर एकमत झाल्याची घोषणा केली. त्यानुसार माघारीची प्रक्रिया सुरू असल्याचे व्हिडीओ आणि छायाचित्रांवरून दिसत आहे.
बंकर्स, चौक्या, हेलिपॅड हटविले
- पीपल्स लिबरेशन आर्मीने पँगाँग सरोवरच्या उत्तर किनाऱयावरून मागे जाण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.
- या परिसरात चीनने बंकर्स, चौक्या, हेलिपॅड उभे केले होते. आता हे हटविण्यास सुरुवात झाली आहे.
सॅटेलाईट, ड्रोनची करडी नजर
सैन्य माघार योग्यरितीने होते का हे पाहण्यासाठी दोन्ही देशांकडून ड्रोन आणि सॅटेलाईटद्वारे नजर ठेवली जात आहे. मंगळवारी जारी केलेल्या व्हिडीओ आणि फोटोनुसार चीनी सैनिक माघारी फिरत असून, ट्रकमधून ते जात असल्याचे दिसत आहे.
माघारीची प्रक्रिया पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस
- 10 फेब्रुवारीपासून दोन्ही देशांनी सैन्य माघारी सुरू केली आहे. हिंदुस्थानचे लष्कर फिंगर तीन येथे थांबणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस लागणार आहेत.
- पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱयानंतर दक्षिण भागातून चीनकडून सैन्य माघारी सुरू होणार आहे.
- चीनकडून सैन्य माघार होत असल्यामुळे पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव निवळल्याचे सध्यातरी चित्र आहे. परंतु कुरापतखोर चीन खरंच शब्द पाळेल का? याबाबत शंकाही उपस्थित होत आहे.





























































