इस्रो वैज्ञानिकांशी पत्रकाराची अरेरावी, नंतर ट्विटरवर माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवारी चांद्रयान मिशनमध्ये विक्रम लँडरचा लँडिगपूर्वीच संपर्क तुटला. यावर एनडीटीव्ही पत्रकाराने इस्रोच्या कर्मचार्‍यांशी चढ्या आवाजात संचालक कुठे आहे आहे असं विचारत अरेरावी केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकाराने जाहीर माफी मागितली.

शनिवारी रात्री चांद्रयान -2 चे विक्रम लँडरचा चंद्रावर उतरताना त्याचा संपर्क तुटला. जेव्हा लँडरशी संपर्क तुटला तेव्हा लँडर चंद्राच्या पृष्ठभूमीपासून 2.1 किमी उंचीवर होतं. याबाबत इस्रोचे कर्मचारी पत्रकारांना माहिती देत होते. त्यानंतर इस्रोच्या एका वैज्ञानिकाने पत्रकार कक्षात सूचना दिली की पुढील पत्रकार परिषद रद्द झाली असून पंतप्रधान मोदी रविवारी सकाळी देशाला संबोधित करतील. तेव्हा एनडीटीव्हीचे पत्रकार पल्लव बागला यांनी चढ्या आवाजात विचारले की अशा वेळी इस्रोचे प्रमुख के. सिवन इथे उपस्थित का नाहीत? या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अनेक ट्विटर युजर्सजनी बागला यांना या घटनेबाबत माफी मागायला लावली. अनेकांनी तुमचा मालक प्रणव रॉय कुठे आहे अशीही विचारणा केली. शेवटी बागला यांनी आपली वागणूक चुकीची होती, इस्रोबद्दल आपल्याला खूप आदर आहे. कालच्या घटनेबद्दल आपण जाहीर माफी मागतो” असे ट्विटरवर म्हणत माफी मागितली.