श्री विठ्ठल मंदिरातील मूर्तींची विशेष काळजी घ्या! पुरातत्व विभाग व मंदिर व्यवस्थापनाला डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांच्या मूर्तीची होणारी झीज रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करा असे सक्त निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग आणि मंदिर प्रशासनाला दिले. श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीचे चरण झिजले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाविकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरल्याने आज डॉ. गोऱ्हे यांनी तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली.

या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत मिश्रा, सहायक संचालक विलास वाहने, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, पत्रकार सुनील उंबरे आदी उपस्थित होते.

पुरातन काळापासून वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दोन्ही मूर्तींची विशेष काळजी घ्यायला हवी. पुरातत्व विभाग, मंदिर आणि मूर्ती संवर्धन विषयातील तज्ञ यांचे मत विचारात घेऊन, वारकरी संप्रदायाच्या भावना या बाबींची सांगड घालून उपाययोजना कराव्यात. यासाठी पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजनांबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल येत्या 5 मे पर्यंत सादर करावा, अशा सूचना आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सोलापूर जिल्हाधिकारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला दिल्या.

पंढरपूर येथील रुक्मिणी मातेच्या मूर्तीचा वज्रलेप निघत असल्याचे वृत्त प्रसिद्ध काही दिवसापूर्वी झाले होते. यामुळे पंढरपूर येथील नागरिक आणि वारकरी संप्रदायामध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

मंदिराच्या गर्भगृहात वापरले जाणारे पूजासाहित्य, द्रव पदार्थ यामुळे गाभाऱ्यातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असल्याची शक्यता यावेळी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ही आर्द्रता कमी करण्यासाठी मंदिरातील मार्बल काढण्याबाबत योग्य, निर्दोष पद्धतीचा अवलंब करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घ्यावी. वज्रलेपाची झीज थांबविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इतर मंदिरात केलेल्या उपाययोजना, त्या त्या मंदिर समित्यांचा अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असेही उपसभापतींनी या बैठकीत स्पष्ट केले.