
वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘नीट पीजी’ ही प्रवेश परीक्षा येत्या 11 सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यासंदर्भातील घोषणा केली. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक त्या उपाययोजना अमलात आणत ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्य़ा नीट या प्रवेश परीक्षेची घोषणा केली होती. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेकडे लागून राहिले होते. अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून ही परीक्षा आता 11 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या अगोदर ही परीक्षा 18 एप्रिल रोजी घेण्यात येणार होती, मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर या परीक्षेची नवी तारीख जाहीर केल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्य़ा लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

























































